जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वैमनस्यातून ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील (वय २७) या तरुणाची धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ३ ऑक्टोबर मध्यरात्री १२.३० वाजता घडली होती. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या अवघ्या १२ तासांत एका संशयित आरोपीला नशिराबाद परिसरातून अटक केली आहे.

योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) असे अटक केलेल्या मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना पाटील यांचे परिसरातील काही तरुणांशी जुने वाद होते. गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नाना पाटील हे त्यांच्या परिसरातील एकता मित्र मंडळाच्या देवीच्या मंडपाजवळ उभा होता. त्यावेळी आरोपी योगेश उर्फ पिंटू पाटील याने त्याच्या एका नातेवाईकासह नाना पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला.
तलवार आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या पोटावर आणि मांडीवर गंभीर आणि प्राणघातक वार केले. या हल्ल्यात नाना पाटील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. उपस्थित मित्रांनी तातडीने धाव घेत नाना पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर जखमांमुळे उपचार सुरू असतानाच रात्री १२.३० वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घडल्या प्रकाराची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली होती.
पोलिसांची १२ तासांत कारवाई:
या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल नितीन बाविस्कर, पोलीस नाईक किशोर पाटील, छगन तायडे आणि रवींद्र कापडणे यांचा समावेश असलेल्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य संशयित आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू याला नशिराबाद परिसरातून अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली.
या खुनाच्या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या हत्याकांडामुळे जळगाव शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याबद्दल नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



