कल्याण–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महापौरपदावर आपलाच उमेदवार विराजमान व्हावा, यासाठी सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक आणि सावध भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले आहे.

आज मंत्रालयात पार पडलेल्या सोडतीत KDMC चे महापौरपद ST प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याची घोषणा होताच राजकीय समीकरणे बदलली. या प्रवर्गातून शिवसेनेचे नगरसेवक किरण भांगले आणि हर्षाली मोरे हे दोनच निवडून आलेले सदस्य असल्याने, महापौरपदाचे प्रमुख दावेदार म्हणून त्यांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून या दोघांना गळाला लावण्याचे प्रयत्न होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

हीच शक्यता ओळखून शिवसेनेचे कल्याण शहर अध्यक्ष रवी पाटील यांनी तात्काळ हालचाल करत या दोन्ही नगरसेवकांना सोबत घेऊन इनोव्हा गाडीतून ‘अज्ञात स्थळी’ रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील राजकारणात खळबळ उडाली असून, भाजप आणि ठाकरे गटाकडून ‘फोडाफोडी’ होण्याची भीती शिवसेनेने आधीच गृहित धरल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडून आलेले नगरसेवक फुटू नयेत, यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची जुनी पण प्रभावी रणनीती शिवसेनेकडून पुन्हा एकदा वापरली जात असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. महापौरपदासाठी किरण भांगले की हर्षाली मोरे यापैकी नेमके कोणाचे नाव अंतिम होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून थेट निवडीच्या दिवशीच हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, महापौरपदाच्या निवडीपर्यंत आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.



