जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पत्नी शेतात गेलेली व मुले बाहेर खेळत असताना दीपक सीताराम भालेराव (३८, रा. पिलखेडा, ता. जळगाव) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिलखेडा येथे रविवार, ९ जून रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिलखेडा येथील दीपक भालेराव व त्यांच्या पत्नीदेखील शेतीकाम करतात. पत्नी रविवारी ९ जून रोजी सकाळी दीराणीसोबत शेतात गेलेल्या होत्या. तसेच त्यांची दोन्ही मुले घरासमोर खेळत होते. त्या वेळी घरात एकटेच असलेल्या दीपक यांनी गळफास घेतला. नळाला पाणी आल्याने त्यांचा मोठा मुलगा धीरज हा सकाळी १०.३० वाजता पाण्यासाठी घरात भांडे घेण्यासाठी घरात गेला. त्या वेळी त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. तो तसाच धावत आला व त्याने आजूबाजूच्या नागरिकांना हा प्रकार सांगितले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. शेजारील मंडळी व भावांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायत नेले असता तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयत दीपक यांना दोन मुले असून मोठा मुलगा धीरज हा नुकताच दहावी उत्तीर्ण झाला. तर लहान मुलगा सिद्धार्थ हा इयत्ता नववीला आहे. मयताचे भाऊ व आई-वडीलही गावातच राहतात.