मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय काँग्रेस पक्षाने पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी उघडली असून महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी स्टार प्रचारकांची नियुक्ती जाहीर केली. प्रचारासाठी मोठी मागणी असलेल्या नेत्यांची वर्णी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीत केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या नेत्या वायनाड मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार प्रियंका गांधी, अ. भा. काँग्रेस पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल, अशोक गेहलोत या केंद्रीय नेत्यांसह महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधासभेतील पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजित कदम, विधान परिषदेचे पक्षाचे गटनेते सतेज पाटील, खा. प्रणिती शिंदे व इतर मान्यवर नेत्यांसह ४० जणांचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा नेहमीच देशपातळीवर स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश होत असे. महाराष्ट्राचे प्रमुख प्रचारक म्हणूनही त्यांनी यशस्वी धुरा सांभाळेलेली होती. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी विविध मतदारसंघातून मोठी मागणी होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून त्यांनी महाराष्ट्रभर झंझावती प्रचार दौरा करून अनेक प्रचार सभा गाजवल्या. मराठवाड्यातील आठपैकी ७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. याकामी त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. आमदार अमित देशमुख स्वत: लातूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांना या मतदार संघासोबतच आता मराठवाडा आणि महाराष्ट्रभर प्रचार दौरे करावे लागणार आहेत.