एरंडोल, प्रतिनिधी | तापी खोरे महामंडळाचे नूतन उपाध्क्ष माजी आमदार चिमणराव पाटील यांनी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी तालुक्यातील अंजनी प्रकल्पात जमादा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अर्धा पावसाळा उलटूनही एरंडोल तालुक्याला संजिवनी देणाऱ्या अंजनी प्रकल्पात सध्यस्थितीत शुन्य टक्के जलसाठा असल्याने पावसाळी हंगामात जमादा बंधाऱ्यांवरून बरेच पाणी खाली वाहून जाणारे पाणी वाया न जाऊ देता जमादा डाव्या कालव्यातून पारोळा ब्रांच द्वारे अंजनी नदीत सोडण्याची पूर्वापार व्यवस्था आहे. तिचा वापर करून पाणी अंजनी नदीत सोडल्यास अंजनी नदीवरील अंजनी प्रकल्प भरणे परिसराच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे राहणार असल्याचे म्हटले आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी अंजनी प्रक्लापात पाणी साठा करणे ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, शिवसेना गटप्रमुख रविंद्र जाधव आदी हजर होते.