Home Cities जळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक; भाजपकडून १२ तर शिंदेसेनेने ४ नामनिर्देशन अर्ज घेतले

महापौर-उपमहापौर निवडणूक; भाजपकडून १२ तर शिंदेसेनेने ४ नामनिर्देशन अर्ज घेतले


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवड प्रक्रियेला वेग आला असून शुक्रवारी भारतीय जनता पक्षाकडून महापौर व उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज घेण्यात आले. महायुतीची सत्ता स्थापन झालेल्या मनपात आगामी नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू झाली असून अर्ज विक्रीचा आज शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत नामनिर्देशनपत्रे घेतली. जळगाव महापालिकेत महायुतीची सत्ता असल्याने महापौर व उपमहापौर पदावर कोणाची निवड होणार याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी ही निवड प्रक्रिया पार पडणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे मनपा गटनेते प्रकाश बालाणी, उपगटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच विशाल त्रिपाठी यांनी अर्ज घेतले. प्रकाश बालाणी यांनी महापौर पदासाठी चार अर्ज घेतले असून नितीन बरडे यांनी उपमहापौर पदासाठी चार अर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महापौर पदासाठी दोन व उपमहापौर पदासाठी दोन असे अर्ज घेतले. अशा प्रकारे भाजपकडून एकूण १२ अर्ज घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नगर सचिव सतीश शुक्ला यांनी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे उपलब्ध करून दिली.  महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत विविध पक्षांतील इच्छुकांची चाचपणी सुरू असताना शिंदे सेनेनेही आपली उपस्थिती नोंदवली आहे. नगरसेवक मनोज चौधरी यांनी महापौर पदासाठी दोन तर उपमहापौर पदासाठी दोन असे एकूण चार अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे सेनेची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव महापालिकेच्या सत्ताकारणात महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक ६ फेब्रुवारीला होणार असून भाजपकडून मोठ्या संख्येने अर्ज घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आगामी महापौर-उपमहापौर कोण असतील याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound