फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गेल्या काही वर्षांतील कामकाजाचा संपूर्ण हिशोब जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांनी थेट हल्लाबोल करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
नगरपरिषदेत प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये आधीपासूनच शंका व्यक्त होत होत्या. नेमक्या कोणत्या विकासकामांसाठी किती निधी खर्च झाला, कोणती कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आणि त्यांचा लेखाजोखा कुठे आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांमुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज २४ मार्च रोजी झालेल्या जनरल सभेत नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करत प्रशासनाकडून संपूर्ण आर्थिक आणि विकासकामांचा तपशील सादर करण्याची मागणी केली. या निवेदनात अर्थसंकल्पातील खर्च, महसूल वसुली, कर्ज व्यवहार तसेच विकास आराखड्यात करण्यात आलेले बदल याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरसेविकेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये निधीचा वापर नेमका कुठे झाला, कंत्राटदारांची निवड कशा पद्धतीने करण्यात आली आणि मंजूर कामांची सध्याची स्थिती काय आहे, यावर स्पष्ट उत्तर देण्याची मागणी करण्यात आली आहे. फक्त विकासाच्या घोषणा केल्या गेल्या की प्रत्यक्षात काही वेगळाच कारभार सुरू होता का, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्येही याबाबत उत्सुकता आणि नाराजी दिसून येत आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना माहिती मिळणे हा मूलभूत हक्क असल्याचे सांगत हा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी अधिक तीव्र होत आहे.
दरम्यान, हा हिशोब समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काय उत्तर दिले जाते आणि पुढील कारवाई काय होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



