Home क्राईम भाईगिरीची नशा उतरली! रील बनवणं पडलं महागात : तरुणाचा माफीनामा व्हायरल

भाईगिरीची नशा उतरली! रील बनवणं पडलं महागात : तरुणाचा माफीनामा व्हायरल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियावर स्वतःला ‘भाई’ म्हणवून घेत प्रसिद्धी मिळवण्याचा नाद एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. इन्स्टाग्रामवर भाईगिरीची भाषा वापरून रील पोस्ट करणाऱ्या चेतन सोळंके या तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी असा काही ‘खाक्या’ दाखवला की, त्याने थेट हात जोडून माफी मागितली आहे.

आजकल तरुणांमध्ये सोशल मीडियावर भाईगिरी, हत्यारे किंवा गुंडशाहीचे समर्थन करणारी रिल्स बनवण्याचे फॅड वाढले आहे. चेतन सोळंके या तरुणाने देखील इन्स्टाग्रामवर भाईगिरीची भाषा वापरत एक रील पोस्ट केली होती. ही रील व्हायरल होताच जळगाव पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली.

जळगाव शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याला कायद्याची समज दिली. पोलिसांच्या कारवाईचा धसका घेतलेल्या या तरुणाने लगेचच आपला पवित्रा बदलला. पोलिसांसमोर उभे राहून त्याने एक नवीन व्हिडिओ तयार केला, ज्यामध्ये त्याने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

नव्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये चेतन म्हणाला, “जळगाव जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. माझ्याकडून चुकीची रील पोस्ट झाली होती, त्याबद्दल मी माफी मागतो. इथून पुढे मी किंवा माझ्या कोणत्याही मित्राने अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू नयेत.”

जळगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सोशल मीडियावर स्टंटबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. “सोशल मीडियाचा वापर विधायक कामासाठी करा, गुन्हेगारीचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही,” असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.


Previous articleजळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल 
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound