राज्यात काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा इशारा देण्यात आला असून, फेब्रुवारीतच उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार आहेत.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. 5 फेब्रुवारी रोजी पुणे आणि इतर भागांत तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागांत सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत आहे.

उत्तर बांगलादेश आणि ईशान्य भारतात चक्राकार वादळाची स्थिती आहे, तर हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहेत. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट जाणवत असली तरी महाराष्ट्रात कोरडे व शुष्क वातावरण राहणार आहे. पावसाचा कोणताही अंदाज नसल्याने उकाडा अधिक तीव्र होईल.

Protected Content