चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनक्षेत्रात एका वाघाने तीन जणांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती. खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात भोलाने रामदेगी परिसरातील निमढेला येथील गुरे चारणाऱ्या सूर्यभान हजारे याला ३० ऑक्टोबर २०२३ ला प्रथम आपले भक्ष्य बनविले होते. त्यानंतर निमढेला कुटीवरील वनमजूर रामचंद्र हजारे याला २५ जानेवारी २०२४ ला ठार केले होते. तर अलिकडे १५ मे रोजी खानगाव येथील अंकुश खोब्रागडे याला सकाळी शेतात ठार केले.
तपास झाल्यावर हे समोर आले की तो ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील भोला हा वाघ असल्याचे समजले. परिणामी, तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या भोला वाघाला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती. अखेर वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. निमढेला परिसरात डार्ट मारून रेस्क्यू टीमने या वाघाला जेरबंद केले आहे. भोला हा भानुसखिंडी आणि छोटा मटका यांचा बछडा असून भोला पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मात्र, अलिकडे त्याने केलेल्या हल्ल्यात तिघांचा नाहक बळी गेल्याने या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. परिणामी, आज अखेर त्याला जेरबंद करण्यात आले असून या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला रवाना करण्यात आले आहे.