मुंबई-वृत्तसेवा | मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका काहीसा कमी जाणवत असला, तरी पुढील काही दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने वातावरणात आर्द्रता वाढली असून, त्यामुळे ढगांची दाटी दिसून येत आहे. या ढगाळ हवामानाचा परिणाम म्हणून किमान तापमानात वाढ झाली असून थंडीचा प्रभाव सध्या कमी झाला आहे. मात्र ही स्थिती फार काळ टिकणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे सध्या किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस असून, ते येत्या ५ व ६ जानेवारीला १३ अंशांपर्यंत आणि त्यानंतर ११ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये सध्या १९.५ अंश असलेले तापमान पुढील काही दिवसांत १८ ते १७ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील इतर भागांतही साधारण अशीच स्थिती राहणार आहे.
मराठवाडा विभागात ८ जानेवारीपर्यंत तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून, एकूणच हवामान कोरडे राहणार आहे. दरम्यान, मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात घट होईल, मात्र कमाल तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या आसपास कायम राहील, अशी माहिती कृषी विद्यापीठ, परभणी येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.
उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट सक्रिय झाली आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे पंजाब, हरियाणा व दिल्लीसह अनेक भागांत तीव्र थंडी आणि धुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. उत्तरेतील ही थंडीची लाट महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर येथेही थंडीचा जोर वाढवू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



