जळगाव, प्रतिनिधी | ज्योतिष शास्त्रानुसार नुकतेच एक मोठे राश्यांतर पार पडले असून आपल्या सूर्यमालेत सूर्याखालोखाल आकाराने मोठ्या असलेल्या गुरु ग्रहाने नुकताच वृश्चिक राशीतून धनू राशीत प्रवेश केला आहे. गुरुचे हे राश्यांतर राशी चक्रातील १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारचा प्रभाव टाकणारे आहे. त्याचा कोणत्या राशीवर आरोग्याच्या दृष्टीने काय प्रभाव पडणार आहे ? याची सविस्तर माहिती आता आपण मेडिकल अॅस्ट्रोलॉजीचे गाढे अभ्यासक व सुवर्णपदक विजेते डॉ. शेखर भावे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्र हे अतिशय क्लिष्ट आणि गहन असे शास्त्र आहे. त्यामुळेच त्याचे अनेक निष्कर्ष हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असतात. ज्योतिष शास्त्रात सगळे ग्रहगोल आपल्या नियमित गतीप्रमाणे वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करीत असतात. अवकाशात हे राशीमंडळ सर्वसामान्यांसाठी अदृश्य असले तरी ज्योतिष शास्त्रात मात्र त्याला मोठे महत्व असते. ग्रहांच्या या भ्रमणाचा प्रत्येक राशीच्या जातकावर वेगवेगळा चांगला-वाईट असा परिणाम वेळोवेळी होत असतो.