घरफोडी करून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील रायसोनी नगरात तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ६० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आकाश अनिल पाटील वय-२८, रा. मोहाडी रोड, रायसोनी नगर, जळगाव हा तरुण आपल्या आईसह वास्तव्याला आहेत. कामाच्या निमित्ताने ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद होते. याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने आणि १० हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर शनिवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता आकाशच्या शेजारी राहणारे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार आकाश पाटील हा घरी तात्काळ हजर झाला, त्यावेळी घरात पाहणी केली असता घरात सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला व चोरी झाल्याचे लक्षात आले. रविवारी ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी करत आहे.

Protected Content