जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राखी म्हणजे केवळ एक दोर नव्हे, तर भावाच्या हातावर बहिणीच्या प्रेमाचं आणि नात्याच्या असामान्य नात्याचं प्रतीक. भारतात श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा रक्षाबंधन हा सण प्रत्येक भावंडाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. मात्र, हा सण केवळ भारतापुरता मर्यादित नाही. जगभरात, विशेषतः ज्या देशांमध्ये भारतीय किंवा हिंदू समुदाय आहे, तिथेही रक्षाबंधन तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन साजरे होणार असून, यानिमित्ताने या सणाचे जागतिक स्वरूपही अधिक अधोरेखित होते.
पाकिस्तानमध्ये हिंदू समाजाची लक्षणीय वस्ती असून तिथेही रक्षाबंधन मोठ्या भक्तिभावाने साजरे होते. बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. हा सण तिथल्या हिंदू कुटुंबांमध्ये एकजुटीचं प्रतीक बनून राहिला आहे.

मॉरिशसमध्ये भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. येथे रक्षाबंधन ‘भाई-बंधन’ या नावाने ओळखला जातो आणि तो एका कौटुंबिक उत्सवाच्या रूपात साजरा होतो. पारंपरिक पोशाख, गोडधोड, आणि सामूहिक कार्यक्रमांमुळे हा दिवस विशेष होतो.
नेपाळमध्ये हा सण अत्यंत लोकप्रिय आहे. भारताशी लागून असलेला हा देश संस्कृती आणि धार्मिक परंपरांमध्येही भारताशी जवळीक साधतो. इथेही बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि हे नातं एका पवित्र बंधनात गुंफले जाते.
सौदी अरेबियासारख्या मुस्लिम बहुल देशातही भारतीय लोक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त वास्तव्यास आहेत. अशा परदेशस्थ भारतीय नागरिकांमुळे रक्षाबंधनसारखे सण तिथेही साजरे होतात. कुटुंबापासून दूर असतानाही लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात आणि भारतीय संस्कृतीची आठवण जपतात.
ब्रिटनमधील लंडनसह अनेक शहरांमध्ये स्थायिक भारतीय कुटुंबे रक्षाबंधन मोठ्या भक्तीभावाने साजरे करतात. येथे विविध मंदिरांमध्ये सामूहिक राखी कार्यक्रम होतात. भारतातल्या वेळेनुसार दिवस ठरवून, भावंडं एकमेकांना ऑनलाईन राखी पाठवतात आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हा पवित्र क्षण साजरा करतात.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या पश्चिमी देशांमध्येही रक्षाबंधन हा सण भारतीय समाजाने आपल्या परंपरेप्रमाणे जपलेला आहे. येथील मंदिरं, सामाजिक संस्थांद्वारे राखीचे कार्यक्रम आयोजीत केले जातात. विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वजण या दिवशी एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात.
रक्षाबंधन हा सण भलेही मूळतः भारतीय असला, तरी त्याचे स्वरूप आता जागतिक बनले आहे. भारतीयांनी जिथे पाऊल ठेवले, तिथे त्यांनी आपली संस्कृती, परंपरा आणि सणही रुजवले. त्यामुळे रक्षाबंधन हा सण आता केवळ भाऊ-बहिणीपुरताच न राहता, तो भारतीय ओळखीचा आणि सांस्कृतिक वारशाचा प्रतीक बनून संपूर्ण जगभरात साजरा होतो आहे.



