यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा गावासह परिसरातील इतर गावांना जलसंजीवनी ठरणारे सातपुडाच्या पायथ्याशी असलेले मोर धरणात अवघा 25.96 टक्केच जीवंत जलसाठा साठा शिल्लक आहे. त्यामुळे हिंगोंण्यासह परिसरातील गावांसमोर भीषण जलसंकट उभे राहिले आहे.
एप्रिल महिन्यामध्ये 25.96 टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने गावासह परिसरात भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी सुध्दा खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सुद्धा संकट निर्माण झाले आहे. यामुळे केळी पिकाचे बाग शेतकऱ्यांनी फेकून दिले आहेत. हिंगोणा या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना येणारे पुढचे दोन महीने हे अत्यंत भिषण जलटंचाईत जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संकटामुळे नागरीक अधिक चिंताग्रस्त झाले आहे.
हिंगोणे गावात मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत 47 लक्ष एवढ्या निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत गावात जलकुंभ उभारणे व जलवाहिनी टाकणे असा आहे. पण गावाला सुरळीत पाणीपुरवठाच होत नसून 25 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे या योजनेअंतर्गत उभारत असलेल्या जलकुंभात व जलवाहिनीत पाणी येणार कुठून?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या योजनेत विहीरीचे व ट्युबवेल समाविष्ट करणे गरजेचे आहे. जेणेकरून शासनाचा निधी वाया जाणार नाही व शासनाचे उद्दिष्ट सफल होईल. गावासह शेतीशिवारात ग्रामपंचायत मालकीच्या विहिरी व ट्युबवेल आहे. पण पाणी पुरवठ्याचे नियोजन व मुख्य जलवाहिनीवरून घेतलेले नळ कनेक्शनमुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केंद्रशासनाच्या अंतर्गत दोन ट्युबवेल करण्यात आल्या. परंतु नियोजन शून्य कारभारामुळे या ट्युबवेलला पाणी लागले नाही व शासनाचा निधी पूर्णपणे वाया गेला आहे. तरी सरपंच ग्रामसेवक व कार्यकारी मंडळाने भीषण पाण्याची टंचाई या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. तसेच मुख्य जलवाहिनीवरून घेतलेले नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.