नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय हवाई दलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली त्यावर काहीजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावर हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी लक्ष्यावर अचूक प्रहार केल्यानंतर किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही. ते सरकारचे काम आहे असे सांगितले.
‘जैश’च्या कॅम्पवर भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले? हे सरकारने जाहीर करावे अशी मागणी होत आहे. पाकिस्तानकडूनही एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला जात आहे. एअर स्ट्राइकनंतर प्रथमच हवाई दल प्रमुख धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली. आम्ही लक्ष्य निश्चित केले होते आणि त्यावरच अचूक निशाणा साधला. जंगलात बॉम्ब टाकले असते तर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली नसती. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याची आकडेवारी सरकारच सांगू शकेल, असे ते म्हणाले. एक ठरवलेले ऑपरेशन असते. ज्याचे नियोजन तुम्ही करता आणि ते प्रत्यक्षात आणता. पण जेव्हा शत्रू तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा उपलब्ध असलेल्या प्रत्येक फायटर विमानाकडून उत्तर दिले जाते. मग ते फायटर विमान कुठलेही असो. आपली सर्व फायटर विमाने शत्रूचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.