मुंबई, वृत्तसेवा | सरकारने हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार गमावला असून हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार मला आहे. गेली पाच वर्षे काय करत होता ? असा रोखठोक प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागाठणे येथील सभेत केला. नोकऱ्या मिळतील, बँकांची कामं सुरळीत होतील, पण त्यासाठी सरकारवर अंकुश हवा. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.
‘मी कोणतंही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. रेल्वे भरतीसाठी आंदोलन केलं, रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले हटवले, पोलिसांसाठी रस्त्यावर उतरलो, मराठी सिनेमे, मराठी माणसांसाठी आंदोलने केली. मनसेने ही आंदोलनं केली,’ असं ठाकरे म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, पीएमसी बँकेवर भाजपची लोकं, सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेची लोकं आहेत. वाट्टेल तसा कारभार सुरू आहे. यावर कोणाचं नियंत्रण नाही? बँका लुटल्या जात आहेत, आणि सरकार, रिझर्व्ह बँक काहीच करत नाही. अब की बार मोदी सरकार…सरकार तुमच्या हातात आलं तर उद्योगधंदे का बंद पडताहेत? लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आज जी मुलं-मुली शिकताहेत, त्यांना नव्या नोकऱ्या कुठून मिळणार? मुख्यमंत्र्यांची सभा सुरू होण्याअगोदर भाजपचा टी-शर्ट घालून एका युवकाने आत्महत्या केली. किती राग आहे लोकांच्या मनात ते यावरून दिसतं. काश्मीरमधलं ३७० कलम हटवलं ह्यावर भाजप महाराष्ट्रात मतदान मागत आहेत; कलम ३७० काढलंत, तुमचं अभिनंदन, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोला असे अवाहन केले.