
मुंबई-वृत्तसेवा | आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो स्थलांतरित कामगारांचे जीवन धोक्यात आले असून, जीव मुठीत धरून ते काम करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कतारमध्ये घरगुती कामगार म्हणून काम करणाऱ्या 49 वर्षीय नॉर्मा टॅक्टाकॉन हिची कहाणी या परिस्थितीची भयावहता अधोरेखित करते. सायरन वाजला की ती देवाकडे प्रार्थना करते. ‘हवेत क्षेपणास्त्रे पाहून भीती वाटते. मला जिवंत राहायचं आहे – माझ्या मुलांसाठी. मीच त्यांचं सर्वस्व आहे,’ असे ती सांगते.

नॉर्मा मूळची फिलिपिन्सची असून तिचे पती आणि तीन मुले तिथेच आहेत. फिलिपिन्समध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत आखाती देशांमध्ये 4 ते 5 पट अधिक, म्हणजे सुमारे 500 डॉलर (45 हजार रुपये) दरमहा मिळत असल्याने जीव धोक्यात घालूनही ती परत जाण्याचा निर्णय घेऊ शकत नाही.
नॉर्मासारखे अनेक कामगार या संकटात अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) आकडेवारीनुसार, आखाती देशांमध्ये सुमारे 2.4 कोटी स्थलांतरित कामगार कार्यरत आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया येथील कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. या युद्धामुळे आतापर्यंत किमान 12 दक्षिण आशियाई कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेपाळचा 29 वर्षीय दिबास श्रेष्ठ अबुधाबीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 1 मार्च रोजी इराणच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचे काका रमेश सांगतात, ‘आम्ही त्याला परत येण्यास सांगितले होते, पण तो म्हणायचा – इथे चांगले जीवन आहे.’ 2015 च्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या घराच्या पुनर्बांधणीसाठी तो पैसे साठवत होता. दुबईमध्ये बांगलादेशचा 55 वर्षीय अहमद अली क्षेपणास्त्राच्या ढिगाऱ्याखाली मृत्यूमुखी पडला. तो दरमहा 45 ते 55 हजार रुपये कुटुंबाकडे पाठवत होता.
युद्धामुळे परतण्याचे मार्गही कठीण झाले आहेत. दुबई, अबुधाबी आणि कतारमधील उड्डाणांवर परिणाम झाला असून, काही देशांनी स्थलांतरित कामगारांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. फिलिपिन्सच्या एका परतीच्या उड्डाणासाठी 234 मजुरांना कुवैत, कतार आणि बहरीनमधून तब्बल 8 तास रस्त्याने सौदी अरेबियात नेण्यात आले, त्यानंतर त्यांना विमान मिळाले. तरीही अनेक कामगार परतण्यास तयार नाहीत.
म्यानमारची 31 वर्षीय सू सू दुबईमध्ये रिअल इस्टेट कंपनीत काम करते. स्वतःच्या देशातील गृहयुद्धापासून बचाव करण्यासाठी ती येथे आली होती. सायरन ऐकून ती खिडकीपासून दूर होते, मात्र तरीही ती म्हणते, ‘इथलं वातावरण अजूनही शांत वाटतं. मला विश्वास आहे की सर्व काही ठीक होईल.’
दरम्यान, स्थलांतरित कामगारांनी पाठवलेल्या रकमेवर अनेक देशांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. फिलिपिन्सच्या परदेशी मजुरांपैकी सुमारे 10 लाख आखाती देशांमध्ये असून, त्यांच्या रेमिटन्समुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा जवळपास 10% भाग उभा आहे. बांगलादेशातील 1.4 कोटी स्थलांतरितांपैकी बहुसंख्य आखाती देशांमध्ये कार्यरत असून, त्यांची कमाई देशाच्या जीडीपीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
या पार्श्वभूमीवर, आखाती युद्धाचा फटका केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थलांतरित कामगारांच्या जीवितासोबतच त्यांच्या कुटुंबांचे भविष्यही या संघर्षात अडकल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.



