मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. किमान तापमान वाढण्यास सुरुवात झाली होती पण आता पुन्हा किमान तापमानात घट होऊ लागली आहे. राज्यात पुन्हा थंडी पसरली आहे. गारठा वाढल्यामुळे नागरिक पुन्हा गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. राज्यातील किमान तापमानातील वाढ सध्या कायम आहे. २४ जानेवारीपासून किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गारठा कमी झाल्यामुळे उकाडा जाणवू लागला होता. राज्यातील किमान तापमानाचा पारा १० वरून थेट १५ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी थोडी फार थंडी आणि दिवसा कडाक्याचे ऊन असे वातावरण या ठिकाणी आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील तापमान वाढले आहे. अशामध्ये आता किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना थंडी अनुभवता येणार आहे.
राजस्थान आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वा-यांची स्थिती कायम आहे. वायव्य भारतात १४५ नॉट्स वेगाने पश्िचमेकडील जोरदार वा-यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणा-या पश्चिमी चक्रवातांमुळे देशातील अनेक राज्यांत थंडी पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याचाच परिणाम आता महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे. राज्यातील तापमानात काहीशी घट होत थंडी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये थोडीफार थंडी आणि दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. बुधवारी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे आणि निफाड येथेही तापमान १० अंशांच्या खाली होते. तर राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान पुन्हा १५ अंशांच्या खाली आले आहे. आता तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.