जळगाव, प्रतिनिधी | शहरात सद्यस्थितीत मलनिःसारण योजना( भुयारी गटार योजना) नाही. अमृत अभियान अंतर्गत मलनिस्सारण योजनेचे पहिल्या टप्प्याचे काम कामाची सुरुवात शिवाजीनगरमधील बारसे कॉलनी येथे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सीमा भोळे, आमदार चंदुभाई पटेल, आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, नगरसेविका गायत्री शिंदे, पार्वताबाई भिल, ज्योती चव्हाण, नगरसेवक विशाल त्रिपाठी, प्रवीण कोल्हे, राजेंद्र घुगे पाटील, चेतन सनकत, रवींद्र मराठे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त उदय टेकाळे, शहर अभियंता सुनील भोळे, योगेश बोरोले, संजय पाटील, सुभाष मराठे, राजेंद्र पाटील, जीवन प्राधिकरणाचे उप विभागीय अधिकारी बी. जी. पाटील, सहाय्यक अभियंता एम. बी. चौधरी तसेच एलसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड चे हसमुख पटेल, बिपिन बिराणी, दर्शन नकराणी आदी उपस्थित होते. शहरास दररोज ९० दश लक्ष पाणीपुरवठा केला जातो. यापैकी ७२ दश लक्ष लिटर्स सांडपाणी दररोज नाल्यांमधून वाहून जात असते. या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प नसल्याने प्रदूषण होत असल्याने शहरासाठी मलनिःसारण प्रकल्पाची आवश्यकता होती. हा प्रकल्प ३० महिन्यात पूर्ण करावयाचा आहे. यात २४ महिने कामासाठी तर ६ महिने चाचणीसाठी असणार आहे. अहमदाबाद येथील मे. एल. सी. ईन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. या कंपनीने निवेदे रकमेपेक्षा ६.२५ टक्के कमी दराने म्हणजेच १५९ कोटी, २५ लाख, २५ हजार ६५४ रुपयांची या दराने भरली होती. मक्तेदारास कामाचे कार्यादेश देण्यात आलेले असून मक्तेदाराकडून प्रस्तावित जागेवर सर्वेक्षणाचे कामास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते सागर पार्क विकासासाठी मंजूर निधीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.