अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील एक महत्त्वाचा आणि भक्तिभावाने साजरा होणारा पारंपरिक सण — ग्रामदैवत कानबाई मातेचा विसर्जन सोहळा कळमसरे (ता. अमळनेर) येथे सोमवार, ४ ऑगस्ट रोजी पारंपरिक ढोल-ताश्यांच्या गजरात आणि महिलांच्या हृदयस्पर्शी निरोपात मोठ्या उत्साहात पार पडला. सलग तीन दिवस चाललेल्या या उत्सवात गावकऱ्यांबरोबरच गावाबाहेर राहणाऱ्या अनेक भाऊबंदांनी परिवारासह उपस्थित राहून एकात्मतेचे दर्शन घडवले.
शनिवारपासून सुरू झालेला उत्सव सोमवारपर्यंत रंगत गेला. गावातील घरोघरी कानबाई मातेचे पूजन करण्यात आले. महिलांनी पारंपरिक खान्देशी पोशाखात भक्तिभावाने पूजन करत मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सवात आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली. उत्सवात कानबाई मातेच्या दर्शनासाठी जोडप्यांची रांग लागत होती. रात्रीभर कानबाईच्या नावाने भजन, कीर्तन, पारंपरिक गाणी आणि जागरण झाले. गावातील प्रत्येक मंडळींनी सहभागी होत गायक आणि वादकांसोबत भक्तिरसात न्हालेली झिंग अनुभवली.

सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात झाली. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून कानबाईचे पूजन केले आणि प्रसाद अर्पण केला. त्यानंतर डफ, ढोल, ताशा आणि भजनी मंडळाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातील संताजी चौक, महाराणा प्रताप चौक, संत सावता माळी चौक, संत गोरोबा काका चौक, संत मीराबाई चौक, दुर्गानगर चौक आणि महादेवनगर न्यू प्लॉट या भागांत मिरवणुकीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. घरोघरी आरत्या झाल्या आणि गहू-नारळाची ओटी भरून गावकऱ्यांनी देवीला निरोप दिला.
महादेवनगर येथील नवसाचा गणपती मंदिर व महादेव मंदिराजवळ कानबाईला विश्रांती देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी सामूहिक आरती केली आणि “कानबाई माता की जय”चा जयघोष करत भावपूर्ण वातावरणात देवीचे विसर्जन पार पडले. अनेक महिला भावविवश झाल्याचे दृश्य गावाच्या श्रद्धाभावाची साक्ष देणारे ठरले.



