जळगाव प्रतिनिधी । खड्डयामुळे भयंकर त्रस्त झालेल्या जळगावकरांना महापालिका प्रशासनाने खुशखबर दिली असून येत्या १२ दिवसानंतर खड्डे बुजण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आता हे आश्वासन खरेच ठरणार की लबाडा घरचं निमंत्रण ? हे लवकरच समजणार आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत आज महापौरांनी बैठक घेतली. यात नवीन रस्ते तयार करण्यास अडचण असल्याने सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी तात्काळ प्रक्रिया राबवावी अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या. दरम्यान, खड्डे बुजविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याने १२ दिवसानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाची बैठक महापौर सौ.भारती सोनवणे यांनी घेतली. बैठकीला स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, गटनेते भगत बालाणी, नवनाथ दारकुंडे, अॅड.दिलीप पोकळे, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, शहर अभियंता डी.एस.खडके आदी उपस्थित होते.
शहरात अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. अनेक ठिकाणी काम बाकी असल्याने रस्त्यांचे काम देखील करता येणार नाही. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातच रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. आता महापालिका प्रशासनाने खड्ड बुजविण्याचे आश्वासन दिले तरी ते पूर्ण होणार का ? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.