मुंबई प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे स्वतः प्रत्यक्ष उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. डॉ. राऊत हे मृतक सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
उत्तर प्रदेशातील एका दलित सरपंचाची या क्रूर पद्धतीने हत्या झाली. त्यामुळे देशभर उत्तर प्रदेशात दलित सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील दलित समुदायाला एक विश्वास देण्यासाठी डॉ. नितीन राऊत स्वतः या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. आझमगड जिल्ह्यातील सरपंच यांची गोळ्या घालून क्रूर हत्या करण्यात आली. यापूर्वी ही उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर जीवघेणे हल्ले आणि अन्य प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अत्याचार करण्यात आले आहेत.
या प्रकाराची गंभीर दखल घेत काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी श्रीमती प्रियंका गांधी यांनी याप्रकरणाची सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी एक सत्यशोधन समिती या गावात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजयकुमार लल्लु यांना नियुक्त करण्यात आले असून या समितीचे विशेष सदस्य म्हणून अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख डॉ. नितीन राऊत यांनाही नियुक्त करण्यात आले आहे. तसेच खासदार पी.एल. पुनीया, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष, माजी खासदार बृजलाल खाबरी, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आर.के. चौधरी, उत्तर प्रदेशचे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अलोक प्रसाद, उत्तर प्रदेशचे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय प्रभारी प्रदीप नरवाल यांचाही समावेश आहे.