सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निंभोरा येथे संविधान जागर अभियानांतर्गत ‘संविधानाचा अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा प्रारंभ जनजागृती संवाद कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात झाला. सम्राट फाउंडेशन व आम्ही संविधानवादी या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांमध्ये संविधानविषयी सखोल जागरुकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे संविधान जागर अभियानाचे मुख्य प्रचारक अनोमदर्शी तायडे यांचे प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन. त्यांनी संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, स्त्री-पुरुष समानता, महिलांचे अधिकार व सामाजिक न्याय याबाबत सविस्तर भाष्य केले. “संविधान केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून, तो भारतीय समाजाचे आत्मभान आहे. प्रत्येक नागरिकाने ते वाचणे, समजणे आणि जपणे ही नैतिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तायडे यांनी संविधानातील महिलांसाठी असलेल्या कलमांवर विशेष भर दिला. कलम १४ ते १६ अंतर्गत स्त्री-पुरुष समानतेचा मूलभूत अधिकार, कलम ३९(अ) अंतर्गत समान वेतनाचा अधिकार, आणि कलम ५१(अ)(ई) अंतर्गत स्त्रियांप्रती अपमानजनक वर्तनाचा त्याग करण्याचे कर्तव्य अशा अनेक बाबी त्यांनी उलगडून सांगितल्या. त्यांनी स्पष्ट केले की, “संविधान हे महिलांच्या सशक्तीकरणाचे सर्वात प्रभावी साधन आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल कुऱ्हे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल कुऱ्हे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. डी. चौधरी, मुख्याध्यापक विकास जनबंधू, उपशिक्षक गुलाब उघाडे, समितीचे उपाध्यक्ष गौतम कुऱ्हे, दस्तगीर खाटीक, सामाजिक कार्यकर्ते पंकज तायडे, नितेश पोहेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अक्षय तायडे, निलेश बार्हे, ईश्वर लहासे, करन तायडे, मयूर सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
‘संविधानाचा अमृत महोत्सव’ हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, ग्रामीण भागात लोकशाही मूल्यांचा प्रसार करणारा आणि संविधान अधिवेशनासाठी जनमानसात उर्जित चेतना निर्माण करणारा ठरला आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जागरुकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा पाऊल ठरतोय.



