पहूर, ता. जामनेर (वार्ताहर) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या माकडाला ग्रामस्थांनी जिवदान दिले. जंगलातील पाण्याचे स्रोत आटत असल्याने माकडांचे जत्थे गावाकडे धाव घेत आहेत. असेच एक माकड आज (दि.२५) सकाळी पाण्याच्या शोधात शिवनगर वस्तीकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने ते जखमी झाले होते.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शंकर भामेरे, किरण पाटील यांनी वन विभागाशी संपर्क करून या घटनेची माहीती दिली. जामनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनमजूर जीवन पाटील, ईश्वर पारधी, भूरा जोगी, चालक सुनिल पालवे यांच्या पथकाने तत्काळ धाव घेवून जखमी माकडाला उपचारासाठी जामनेर येथील पशुवैदयकिय दवाखान्यात हलवले. गोकूळ सोणवणे, लक्ष्मण कापूरे, सुकराम चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली. जंगल शिवारात कृत्रिम पाणवठ्यांची गरज दिवसागणिक वाढत आहे. जंगलातील नदी, नाले, धरणं कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून पशू-पक्ष्यांना आधार देण्याची गरज आहे.