अमळेनर लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । अखेरच्या क्षणी मारुतीरायाचा पाया पडून प्राण सोडणाऱ्या वानराची गावकऱ्यांनी भावनिक वातावरणात अंत्ययात्रा काढून निरोप देण्यात आला. या घटनेने संपूर्ण गाव हळहळले असून, समाधीस्थळी वानराची मूर्ती उभारण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारच्या वेळी अमळनेर तालुक्यातील नीम गावात ही घटना घडली. गावातील रहिवाशी असलेले हुकूमचंद पाटील यांच्या धाब्यावरून एक म्हातारे वानर खाली पडले. वयोमानामुळे ते विव्हळत होते. गावकऱ्यांनी त्वरित त्याला स्थानिक पशुवैद्यकाकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वानराला ताप असल्याचे निदान केले आणि त्याला इंजेक्शन दिले. त्यानंतर गावकरी त्याला पुन्हा गावातील मारुती मंदिराजवळ घेऊन आले. त्या क्षणी एक विलक्षण दृश्य घडले. वानराने अचानक उडी घेत मारुतीरायाच्या मूर्तीच्या पायाशी डोके ठेवले आणि तेथेच शांत झोपले. गावकऱ्यांनी त्याला हलवून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा त्याने मारुतीच्या पायाशी जाऊन डोके टेकवले आणि शेवटचा श्वास घेतला. या अद्भुत घटनेने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

गावकऱ्यांनी तत्काळ स्थानिक पुजाऱ्याचा सल्ला घेतला आणि वानरासाठी विधिवत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला. नवीन कापड, टोपी आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले. नंतर डोली सजवून संपूर्ण गावातून वाजत-गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील महिला भगिनींसह लहानथोर सर्वजण या अंत्ययात्रेत सहभागी झाले. समाधान कोळी याने आगारी म्हणून जबाबदारी घेतली. गुलाब कोळी, ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील, अशोक कोळी, श्रीराम पवार यांनी खांदेकरी होऊन वानराला अखेरचा निरोप दिला. समाधान कोळीने वानरासाठी आपल्या केसांचा त्यागही केला. यानंतर वानराला योग्य त्या धार्मिक विधींनुसार समाधी देण्यात आली.
गावकऱ्यांनी या घटनेनंतर वानराच्या उत्तरकार्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. तसेच, ज्या स्थळी वानराने अखेरचा श्वास घेतला, त्या ठिकाणी त्याची मूर्ती उभारण्यात येणार आहे. यासाठी गावातील दीपक कोळी, श्रीराम कोळी, अशोक पवार, विलास पवार, जितेंद्र अहिरे, भगवान कोळी, गुलाब कोळी आणि आनंदा कोळी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
या संपूर्ण घटनेमुळे गावात एक वेगळेच श्रद्धेय वातावरण निर्माण झाले आहे. वानर हा मारुतीरायाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गावकरी या घटनेकडे भक्तिभावाने पाहत असून, या वानराची स्मृती जपण्यासाठी त्याची मूर्ती उभारण्यास सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली आहे. गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी आणि श्रद्धेचा हा आगळावेगळा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.


