अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी पाचवे अहिराणी साहित्य संमेलन दिनांक ३० व ३१ मार्च २०२५ रोजी अमळनेर येथे होणार असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, तसेच अनेक साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाचे बोधचिन्ह आर्टिस्ट किरण बागुल यांनी साकारले आहे. प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले की, हे बोधचिन्ह खानदेश व अहिराणी संस्कृतीचे प्रतीक आहे. कानबाई ही शीर्षस्थानी असून, अहिराणी लिपीतील “अ” अक्षर हिरव्या रंगात रेखाटले आहे, जे येथील कृषी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते.
संमेलनात शोभायात्रा, कथा, कविता, गीते, नाटिका, मिमिक्री, परिसंवाद यांसारख्या विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवर विचारवंतांचे मार्गदर्शन आणि कलाकारांचे विविध कलाविष्कार खानदेशवासीयांसाठी साहित्यिक मेजवानी ठरणार आहेत, असे प्रा. अशोक पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, बोलीभाषा ही संस्कृती संवर्धनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर शहरातील विविध संस्था, संघटना व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने परिश्रम घेत असल्याचे संमेलन समन्वयक रणजित शिंदे यांनी सांगितले.