मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी २० मे रोजी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली होती. ही टीका त्यांना भोवली असून निवडणूक आयोगाने निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. आयोगाच्या या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांच्यावर कोणती कारवाई होणार या कडे आता सर्वांचे लक्ष आहे.
उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी मतदान सुरु असताना मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या पत्रकार परिषदेचे विश्लेषण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. दरम्यान, ठाकरे या प्रकरणी दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. भाजप कटकारस्थान करत असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मते मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीके विरोधात आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही निवडणूक आचार आचारसंहितेचे उल्लंघन आहे. ठाकरे यांनी केलेले आरोप हे खोटे असून दिशाभूल करणारे आहेत असा आरोप देखील त्यांनी केला होता. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहीत पत्रकार परिषदे बद्दल माहिती घेतली होती. तसेच या परिषदेच्या तपासणीचे आदेश देखील दिले होते. राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.