Home राजकीय  वेळेचं काटेकोर भान ठेवणारा मोठा भाऊ हरपला – एकनाथ शिंदे  

 वेळेचं काटेकोर भान ठेवणारा मोठा भाऊ हरपला – एकनाथ शिंदे  


बारामती-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारची सकाळ अत्यंत वेदनादायी ठरली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची आज बारामती येथे सभा नियोजित होती. त्यासाठी ते सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा तोल गेल्याने ते जवळच्या शेतात कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली आणि घटनास्थळी एकामागोमाग एक स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या दुःखद घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र भावना व्यक्त करताना अजित पवार यांना “मोठा भाऊ” संबोधले. “ही घटना मनाला वेदना आणि चटका देणारी आहे. अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील, असा विचार कुणीही केला नसेल,” असे सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करणारे, परखड आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून अजित पवार ओळखले जात होते, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, प्रशासनावर असलेली अजित पवार यांची पकड, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून मत मांडण्याची त्यांची सवय आणि निर्णयक्षमता हे गुण त्यांनी जवळून अनुभवले होते. “चूक ती चूकच म्हणण्याचा त्यांचा स्वभाव होता, पण मनाने ते अतिशय निर्मळ होते,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांसोबत केलेल्या कामाची आठवण काढली.

“एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय अजित दादा थांबत नसत. आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रासाठी काम केलं. सकाळी सहा वाजताही लोकांना भेटणारा, वेळेचं काटेकोर भान ठेवणारा नेता आज आपण गमावला आहे,” असे भावूक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परवाच एका कार्यक्रमात झालेली भेट आठवताना, आज सकाळी ही बातमी समजताच त्या आठवणी डोळ्यांसमोर आल्याचे त्यांनी नमूद केले.

अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. “विमान लँडिंगसाठी खाली येत असताना काहीतरी अघटित घडणार, अशी जाणीव झाली. काही सेकंदातच विमान कोसळले आणि मोठा स्फोट झाला. आम्ही मदतीसाठी धावलो, पण विमानाने भीषण पेट घेतला होता. जवळ जाताच एकामागोमाग एक चार-पाच जोरदार स्फोट झाले,” असे त्यांनी सांगितले.

अजित पवार हे वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असल्याने राज्यातील प्रत्येक विभागाचा त्यांना सखोल अभ्यास होता. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. “माझ्या मनात आज एक मोठा भाऊ हरपल्याची भावना आहे,” असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


Protected Content

Play sound