चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोकडे गावातील एका शेतात आज बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घटनास्थळाहून मृत बिबट्याला वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी शवविच्छेदनासाठी नेणार असल्याचे वृत्त आहे. बिबट्याच्या खाण्यात आलेल्या अन्नातून त्यास विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी साधारण ५ वाजेच्या सुमारास रोकडे गावातील एका शेतात बिबट्याचे शव आढळून आले. सुरुवातीला शेतकऱ्यांना बिबट्या झोपला असल्याचा भास झाला. थोडा वेळानंतर मात्र, बिबट्या मृत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, काही दिवसांपासून येथे बिबट्याचा वावर आढळून आल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. तूर्त बिबट्यास विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज असून विषबाधेमुळेच बिबट्या मरण पावला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. बिबट्याच्या पोटातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील आणि त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वनविभाग व पशुविभागाचे अधिकारी पोहचलेले नव्हते.