Home क्राईम रुग्णसेवेचे स्वप्न अपुरेच! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीचा दुदैवी मृत्यू; मैत्रिणींचा आक्रोश

रुग्णसेवेचे स्वप्न अपुरेच! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीचा दुदैवी मृत्यू; मैत्रिणींचा आक्रोश

0
213

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. महिमा चंदन वासनिक (वय-१९, मूळ रा. भंडारा) असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून, तिच्या निधनाने शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिमा ही देवकर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत होती. रविवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता तिने नेहमीप्रमाणे कपडे धुतले आणि त्यानंतर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. ती आपल्या खोलीत परतली असता, तिला तीव्र चक्कर आली आणि ती कोसळली. हा प्रकार लक्षात येताच तिच्या सोबतच्या मैत्रिणींनी तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला ‘मयत’ घोषित केले.

सोमवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास महिमाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात तिच्या सोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आणि मैत्रिणींनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या मैत्रिणीचा मृतदेह पाहताच विद्यार्थिनींनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे रुग्णालय परिसर हेलावून गेला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिमाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करत आहेत. रुग्णसेवेचे स्वप्न उराशी बाळगून भंडाऱ्याहून जळगावात आलेल्या एका तरुण विद्यार्थिनीचा असा अंत झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.


Protected Content

Play sound