Home Cities मुक्ताईनगर पोलीसांसाठी घरांचे स्वप्न साकार; आमदार एकनाथराव खडसेंच्या पाठपुराव्यामुळे वसाहतींचा मार्ग खुला

पोलीसांसाठी घरांचे स्वप्न साकार; आमदार एकनाथराव खडसेंच्या पाठपुराव्यामुळे वसाहतींचा मार्ग खुला


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील पोलीस कर्मचारी वसाहतींच्या दुरवस्थेचा आणि रखडलेल्या बांधकामाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानमंडळात उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वसाहतींच्या नूतनीकरणासाठी आणि नवीन बांधकामासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलल्याची अधिकृत माहिती दिली.

आमदार एकनाथराव खडसे यांनी या तिन्ही ठिकाणच्या पोलीस वसाहतींच्या बिकट अवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. यावर तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ७ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील शासकीय निवासस्थानांच्या बांधकामाचा समावेश ‘प्राधान्यक्रम यादीत’ करण्यात आला आहे. विशेषतः बोदवड येथील प्रशासकीय इमारत आणि निवासस्थानांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची (PMC) नियुक्ती करण्यात आली आहे.

८ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयान्वये या कामांना गती देण्यात आली असून, सध्या तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार खडसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला हा प्रश्न सुटल्याने पोलीस कुटुंबियांना आता हक्काचे आणि सुरक्षित घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांनी “पोलीस कर्मचारी अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असतात, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील वसाहतींचे काम पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील,” अशी भावना व्यक्त केली.


Protected Content

Play sound