Home Cities जळगाव पिंप्राळ्यात ‘संगीतमय नर्मदा पुराण’ कथेची भक्तिमय सांगता 

पिंप्राळ्यात ‘संगीतमय नर्मदा पुराण’ कथेची भक्तिमय सांगता 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा येथील वीर सावरकर नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री संगीतमय नर्मदा पुराण’ कथा ज्ञानयज्ञाची शुक्रवारी अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली. नर्मदा माईच्या जयघोषाने परिसर दुमदुमला असून भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण सोहळ्याला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

वीर सावरकर नगरमधील रहिवासी अलका वारके आणि भागवत वारके यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने या ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीपरंपरेची जोपासना व्हावी या उद्देशाने पार पडलेल्या या कार्यक्रमात ह.भ.प. मनोज महाराज कुलकर्णी (पिंप्राळेकर) यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून नर्मदा पुराणाचे महात्म्य, धार्मिक संदर्भ आणि जीवनमूल्यांशी त्याचा संबंध याविषयी प्रभावी विवेचन केले. त्यांच्या प्रवचनामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते.

गुरुवारी, २९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता काढण्यात आलेला दिंडी सोहळा हा उत्सवाचा प्रमुख आकर्षण ठरला. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या घोषात निघालेल्या या दिंडीत महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या दिंडीने परिसरात धार्मिक उत्साहाची लहर निर्माण केली.

शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी सकाळी ह.भ.प. सारंग महाराज कुलकर्णी यांचे काल्याचे कीर्तन भक्तिभावाने संपन्न झाले. कीर्तनादरम्यान अध्यात्मिक संदेश, भक्तीची गोडी आणि समाजातील ऐक्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत भक्तिभावाने सहभाग नोंदवला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीर सावरकर मित्र मंडळ आणि भवानी माता मंडळ, पिंप्राळा यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील महिला मंडळ आणि पुरुष भाविकांच्या सक्रिय उपस्थितीमुळे संपूर्ण सोहळा उत्सवमय झाला. अध्यात्मिक विचारांची शिदोरी घेऊन भाविक समाधान आणि प्रसन्नतेने मार्गस्थ झाले.  या संगीतमय नर्मदा पुराण कथेमुळे पिंप्राळा परिसरात भक्ती, संस्कृती आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन घडले. धार्मिक परंपरा जपत समाजातील एकात्मता वाढवणारा हा सोहळा भाविकांच्या स्मरणात कायम राहील.

 


Protected Content

Play sound