सांगली वृत्तसंस्था । सांगलीकरांची चिंता वाढली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात जवळपास सहा पट कोरोना रुग्ण वाढले, सात पटीने मृत्यूदर वाढला. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांच्या मृत्यूदरात सांगली जगात सर्वात पुढे पोहोचली आहे.
सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर ४.०६ टक्के झाल्याने आव्हान वाढले आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील स्थिती आणखी बिघडण्याचा धोका आहे.
जुलै महिन्यापर्यंत जिल्हा प्रशासनाला रुग्णांच्या स्वॅब तपासणीनंतर तातडीने दिले जाणारे उपचार आणि कंटेन्मेंटच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे संसर्ग रोखण्यात यश मिळाले होते. ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्ह्यात झालेला करोनाचा उद्रेक हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे.
२७ जुलै रोजी जिल्ह्यात १७६२ रुग्ण होते, उपचारादरम्यान ५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. १० ऑगस्टला रुग्णांची संख्या ४८६९ एवढी झाली. १० ऑगस्टपर्यंत रुग्णांच्या मृत्यूदरात तिप्पट वाढ झाली. २७ ऑगस्टला जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९९४१ एवढी झाली कोरोनाबळींची संख्या ४१२ झाली आहे.
जगातील करोना बळींचा दर सध्या ३.४३ टक्के आहे. भारतात १.८३, तर महाराष्ट्रात हा दर ३.२१ टक्के आहे. सांगलीचा दर सर्वात जास्त ४.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंभीर रुग्णांना वेळेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नसल्यानेच मृत्यूदर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.