जळगाव (प्रतिनिधी) शेतातील मजुरांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील विटनेर येथे आज सकाळी घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणी दीपक मकासरे (वय २४, रा. जळके, ता.जळगाव) यांचे विटनेर शिवारात शेत आहे. काल सायंकाळी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतातील कामांसाठी राणी मकासरे या काही महिलांसह आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास शेतात गेल्या होत्या. राणी मकासरे या सकाळी शेतात पोहोचल्यानंतर मजुरांना पिण्यासाठी पाणी घ्यायला विहिरीजवळ गेल्या. त्याच वेळी विहिरी जवळ असलेल्या इलेक्ट्रिक मोटरच्या लोखंडी पेटीला धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतातील महिलांनी आरडा-ओरडा करून लोकांना बोलावले. परंतू तोपर्यंत उशीर झालेला होता. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विवाहितेच्या पश्चात पती, दोन मुली, असा परिवार आहे. या घटनेमुळे जळके गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, महिलेच्या माहेरचे कुटुंबीय आल्याशिवाय शवविच्छेदन करू नये असा पवित्रा मयत विवाहितेच्या बहिणीने घेतल्यामुळे काही वेळ वातावरण गंभीर झाले होते.