नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | झारखंड विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर कारण्यात आला आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिला टप्पा १३ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर निकाल महाराष्ट्र राज्याबरोबरच २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. झारखंडमध्ये मागच्या वेळेस पाच टप्प्यांत निवडणूक झाली होती. तिथे नक्षली भाग असल्यामुळे निवडणूक घेण्यास अडचणी येतात. यावेळी आम्ही फक्त दोन टप्प्यात निवडणुका घेत आहोत, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
भाजपला यावेळी झारखंडमध्ये सत्ता मिळण्याची सर्वाधिक आशा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र हाच मुद्दा भाजप उचलण्याची शक्यता आहे. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. मात्र हेमंत यांना जामीन मिळताच लगेच त्यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले.
चंपाई यांच्यासारख्या सामान्य आदिवासी कार्यकर्त्याचा हा अपमान आहे असा भाजपच्या टीकेचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीने जरी राज्यातील १४ पैकी ९ जागा जिंकल्या असल्या तरी आदिवासी बहुल पाच जागांवर पक्षाला यश मिळाले नाही. हेमंत सोरेन यांना अटकेची सहानुभूती काही प्रमाणात मिळाली. झारखंडमध्ये जवळपास २५ टक्के आदिवासी आहेत. भाजपला जर ही मते मिळवता आली नाहीत तर सत्ता मिळणे अशक्य आहे. गेल्या वेळी भाजपने बिगर आदिवासी मुख्यमंत्री देण्याचा प्रयोग केला तो फसला. यंदा पक्ष त्यातून धडा घेत आहे. रघुवर दास यांच्याकडे राज्याची धुरा होती, यातून आदिवासींमध्ये नाराजी वाढल्याचा फटका भाजपला बसला.