कोल्हापूर/सांगली (वृत्तसंस्था) सलग सहाव्या दिवशी सांगली आणि कोल्हापुरात पुराचा कहर सुरुच आहे. आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून महापुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीचा दौरा करणार आहेत.
ग्रामिण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झाले आहे. मात्र पावसाची संततधार सुरुच आहे त्यामुळे लोकांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. वीज नाही, घरात पाणी, रस्ते कोलमडलेले, पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती कायम आहे. अशात एकमेकांना हात देत संकटांचा सामना ग्रामस्थ आणि कोल्हापूरकर करत आहेत. एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरगस्तांना काढण्याची कार्यवाही सुरू आहे.