Home Cities जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात १४ एप्रिलला डेली बाजार आणि आठवडे बाजार...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात १४ एप्रिलला डेली बाजार आणि आठवडे बाजार बंद


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील डेली बाजार तसेच हरी विठ्ठल नगर आणि खंडेराव नगर परिसरातील साप्ताहिक आठवडे बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश उपायुक्त पंकज गोसावी यांनी दिले आहेत.

महानगरपालिका हद्दीतील सर्व भाजीपाला विक्रेते, हॉकर्स आणि व्यावसायिकांनी मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. मिरवणुकीचे मार्ग मोकळे ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, जयंतीनिमित्त शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनर्स आणि झेंड्यांबाबतही मनपाने कडक नियमावली जाहीर केली आहे. कोणतेही बॅनर किंवा झेंडे लावण्यासाठी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, ते केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांवरच लावता येतील. विशेषतः इलेक्ट्रिक पोल किंवा फोन लाईनवर बॅनर लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले असून, नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी शांतता राखत सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound