नाशिक प्रतिनिधी । स्वच्छ आणि शुध्द ऑक्सिजन मिळणे काही शहरांमध्ये तर अवघडच झाले आहे. पण हेच ऑक्सिजन आता तुम्हाला 24 तास मिळणार असून नाशिक रेल्वे स्थानकावर देशातील पहिले “ऑक्सिजन पार्लर’ तयार करण्यात आले आहे. देशातील प्रमुख शहरामध्ये औद्योगिकरणामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली आहे.
देशातील पहिले ऑक्सिजन पार्लर हे नाशिक रेल्वे स्टेशनवर तयार करण्यात आले आहे. सध्या या अनोख्या प्रयोगामुळे बरेच लोक या पार्लरला भेट देत आहेत. स्नेक प्लांट, आरेलिया बुश, ड्रॅगन बांबू, चायनीज बांबू, मनीप्लँट, झामीया, झेड प्लांट, बोनझा अशी झाडे येथे लावण्यात आली आहेत. या सर्व झाडांची नावे तुम्हाला नवीन वाटतील. मात्र ही सर्व झाडे प्रदूषण दूर करून ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम करतात. नासाच्या अभ्यासात ही झाडे आरोग्यास उपायकारक असल्याचे समोर आले आहे. आता ही सर्व झाडांची रोपे नाशिकरोड स्टेशनवरील ऑक्सिजन पार्लरमध्ये बघायला मिळत असून याठिकाणी एकूण 18 प्राजाती येथे उपलब्ध आहेत. हे एक झाड 10 बाय 10 परिसरातील हवा शुद्ध करण्याचे काम करते. तसेच 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करते. विशेष म्हणजे या झाडांना 8 दिवसातून एकदाच पाणी टाकावे लागते. रेल्वेस्टेशन म्हटले तर प्रदूषण हे आलेच पण आता या ऑक्सिजन पार्लरमुळे नाशिकरोड रेल्वेस्टेशनचा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या निम फ्रिज पॉलिसी अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून रेल्वे भाडे तसेच तिकीट विक्री व्यतिरिक्त रेल्वेला या माध्यमातून नफाही मिळणार आहे. अशाप्रकारचे पार्लर असणारे नाशिकरोड रेल्वेस्टेशन हे पहिलेच असे स्टेशन आहे.