जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव महापालिकेत कार्यरत ९० कंत्राटी कर्मचार्यांना आज आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून दिला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. यात आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीवरून आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांना धारेवर धरले. याच प्रसंगी त्यांनी महापालिकेत कार्यरत असणार्या ९० कर्मचार्यांना दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याचा मुद्दा देखील नेटाने लाऊन धरला.
महापालिकेतील या ९० कर्मचार्यांना वेतन दिले जात नसल्याने ते अडचणीत आलेले आहेत. तर दुसरीकडे नवा कंत्राटदार शोधून त्याच्या माध्यमातून नवीन कामगार भरतीय करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, नवीन कंत्राटदार येत नसल्यामुळे विद्यमान काम करणार्या ९० जणांवर एकीकडे विनावेतन काम करण्याची वेळ आली असतांना दुसरीकडे त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार देखील आहे.
आमदार राजूमामा भोळे यांनी हीच बाब आज डीपीसीच्या बैठकीत मांडून प्रशासनाचे वाभाडे काढले. नवीन कंत्राटदार येईल तेव्हा येईल, मात्र विद्यमान कर्मचार्यांवर अन्याय का ? अशी भूमिका मांडत त्यांनी या प्रकरणी व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांना साकडे घातले.
ना. गिरीशभाऊ महाजन यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनाची खरडपट्टी काढत सध्या काम करत असलेल्या ९० कर्मचार्यांचे वेतन अदा करून त्यांचे काम पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. यामुळे ना. गिरीशभाऊंच्या माध्यमातून आमदार राजूमामा भोळे यांनी या ९० कर्मचार्यांना न्याय मिळवून दिला आहे.