जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, महायुतीने आज पिंप्राळा भागातील ऐतिहासिक भवानी माता मंदिर परिसरातून आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भवानी मातेचे दर्शन घेऊन आणि विजयाचा नारळ फोडून प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

दिग्गज नेत्यांची मांदियाळी आणि शक्तिप्रदर्शन:
यावेळी राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांसह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पिंप्राळा बाजार मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळली होती, ज्यामुळे परिसरात महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.

पक्षांतर आणि सत्कार सोहळा:
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांनी सर्वांना भगवा गमछा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी प्रदेशाध्यक्षांचा सत्कार करून विजयाची शपथ घेतली.
तिसरे इंजिन जोडा – आ. राजूमामा भोळे:
जळगावच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी केंद्रात आणि राज्यात जसे ‘डबल इंजिन’ सरकार आहे, तसे महापालिकेत महायुतीचे ‘तिसरे इंजिन’ जनतेने जोडावे, असे आवाहन आमदार भोळे यांनी केले.
विकासासाठी एकत्र – गुलाबराव देवकर:
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते गुलाबराव देवकर म्हणाले की, जळगावच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी आम्ही तिन्ही पक्ष एका विचाराने निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत.
७५ जागा जिंकण्याचा विश्वास – मंत्री गिरीश महाजन:
आपल्या आक्रमक शैलीत बोलताना गिरीश महाजन यांनी विरोधकांना इशारा दिला. “जळगावात महायुतीची लाट असून, आम्ही सर्व ७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भव्य सभेमुळे जळगाव शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.



