Home Cities यावल ‘प्रोत्साहनातून अधिकारी’ संकल्पनेतून यशस्वी विद्यार्थी घडणार – प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे

‘प्रोत्साहनातून अधिकारी’ संकल्पनेतून यशस्वी विद्यार्थी घडणार – प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे

0
152

फैजपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे अध्यक्षस्थानी होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समाजातून प्रेरणा मिळावी, या हेतूने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे यांनी आपल्या मुलाच्या लग्नप्रसंगी आलेल्या आहेराच्या रकमेचा उपयोग करत विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासू विद्यार्थी प्रोत्साहन उपक्रम’ सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत कै. दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या पहिल्या चार विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षभराचा आर्थिक खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून उचलत एक प्रेरणादायी सामाजिक भूमिका बजावली. या स्पर्धेत कु. गायत्री पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला.

कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी प्रबोधिनीच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “या उपक्रमांचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या परिसरातून भविष्यात IPS आणि IAS अधिकारी घडावेत. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अशा प्रोत्साहनामुळे त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते मोठ्या उद्दिष्टांसाठी प्रयत्नशील राहतात.”

प्रा. डॉ. सुरवाडे यांनी सांगितले की, “स्वतःच्या आर्थिक प्रवासात मिळालेल्या मदतीमुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे आज कोणत्याही विद्यार्थ्याचे स्वप्न केवळ आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहू नये, म्हणून हा उपक्रम राबवत आहे.” त्यांनी प्रबोधिनीच्या माध्यमातून ‘प्रोत्साहनातून अधिकारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श उभा केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपक सूर्यवंशी यांनी पार पाडले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीपासून कार्यक्रमाच्या आयोजनापर्यंत सर्व प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे, प्रा. डॉ. दिपक सूर्यवंशी, प्रा. विजय तायडे, प्रा. पंकज बोदडे, प्रा. उन्नती चौधरी आणि प्रा. सीमा चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी प्रा. डॉ. सुरवाडे यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या वाटचालीस दिशा दाखवणारा आणि त्यांना आर्थिक आधार देणारा हा उपक्रम भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी निश्चितच प्रभावी ठरेल.


Protected Content

Play sound