भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |शहरातील रामायण नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवार २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील डालचंद अग्रवाल (वय-५६) रा. रामायण नगर, कंटेनर यार्ड, भुसावळ हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. मेडिकल दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. १७ डिसेंबर ते २० डिसेंबर त्यांचे घर बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून घरातील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर सामान असा एकूण ५ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार बुधवार २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. या संदर्भात शनिवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे.