जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ओम शांती नगर येथे बंद घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि साड्या असा एकूण ९२ हजार ५०० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश राजाराम सोनवणे (वय-३०) रा. ओम शांती नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १२ एप्रिल दुपारी ३ वाजता ते आपल्या वैयक्तिक कामासाठी बाहेर गावी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि अडीच हजार रुपये किमतीच्या साड्या असा एकूण ९२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. जय सोनवणे हे गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता घरी आल्यावर त्यांना घराचा दरवाजा कुलूप तुटलेला दिसून आला. त्यानंतर त्यांनी आत प्रवेश करून पाहिले असता घरात सामान अस्ताव्यस्त झालेले दिसून आले व घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि साड्या चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहेत. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.