कासोदा (प्रतीनिधी ): एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे दुपारी सव्वा दोन वाजता पावसाला सुरुवात झाली . पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडत होता की पाऊस पडतोय की ढग फुटी झाली आहे असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत होते.
उत्राण येथे पावसाचा जोर वाढल्याने ग्रामस्थांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावात कम्बरे एवढे पाणी शिरले होते. पावसामुळे उत्राण येथील निलॉन्स कँपनीच्या लोणचे भरण्याच्या २५० लिटर्स ३०० लिटर्स च्या बरण्या पाण्याबरोबर गावात ,शेतात, रस्त्यावर वाहून आल्यात. तर गावातील असंख्य घरांची पडझड झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या पिकसोबत वाहून गेल्या आहेत. उत्राण येथील रहिवासी महादु देविदास खैरनार यांच्या घरात पाणी घुसले तर उर्वरित घरांमध्ये पाणी घुसल्याने घर मालकांचे देखील नुकसान झाले आहे. झाडांची पडझड झालेली दिसून आली व शेतावरील बांध फुटून काहीकाळ तेथे तलावा प्रमाणे दृश्य पाहावयास मिळत होते. गावांत, गल्लो गल्ली पाणीच पाणी झाल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण होते. तर वाहतूक काही काळ ठप्प झालेली दिसून आली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाकडून नुकसान भरपाई भरून मिळावी अशी विनंती उत्राणयेथील पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन यांनी केली आहे व त्यांच्या समवेत ग्रामस्थांनी देखील तातडीची मदत करावी अशी मागणी करीत आहेत.