जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकार्यांसह आज तरसोद ते पाळधी या महामार्गावरील बायपासची पाहणी करून निर्देश दिलेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील जळगाव बायपासच्या प्रगतीपथावरील कामांचा पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा जळगाव तहसीलदार अर्पीत चव्हाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जयश्री माळी, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार विजय बनसोडे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, शेळावे बॅरेजचे अधिकारी ही उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव बायपासच्या कामांना गती देण्यात यावी. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदारांनी बायपासच्या भराव कामासाठी दीड लाख टन माती, मुरूम आवश्यक आहे. अशी मागणी केली त्यावर पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, शेळगाव बॅरेजमधून नियमानुसार रायल्टी भरून मुरूम, माती उपलब्ध करून घ्यावी. यासाठी महसूल व शेळगाव बॅरेज प्रकल्पातील अधिकार्यांनी सहकार्य करावे. महामार्गवर येणार्या रेल्वे फाटक उड्डाणपूलाच्या बाबतीत जिल्हाधिकार्यांनी रेल्वे अधिकार्यांशी चर्चा करावी.
बैठकीपूर्वी, जळगाव शहराच्या बाहेरून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या तरसोद- पाळधीच्या बायपासच्या कामांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी पाहणी केली. याप्रसंगी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा जळगाव तहसीलदार अर्पीत चव्हाण, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार विजय बनसोडे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार तसेच महामार्ग प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तरसोदकडे जाणार्या आसोदा रेल्वे उड्डाणपूलापासून पाहणीस सुरूवात केली. तरसोद ते पाळधी या १८ किलोमीटरचा बायपासच्या संपूर्ण कामांची जिल्हाधिकार्यांनी पाहणी केली. या राष्ट्रीय महामार्ग बायपासच्या मार्गावर अनेक लहान मोठे गावे येतात. त्यात तरसोद, असोदा, भोकणी, आव्हाणे, मुमुराबाद, जळगाव शिवार, पाळधी आदी गावांचा समावेश आहे. बायपास अंतर्गत तीन ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत. गिरणा नदीवरील तीनशे मीटरच्या पुलाचे काम सध्या गतीने सुरू आहे. या सर्व कामांची जिल्हाधिकार्यांनी आज पाहणी केली व प्रगती जाणून घेतली.
बायपास महामार्गाचे कामात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महसूल विभागाने बायपासवरील शेत जमीनीचे विक्रमी वेळेत भूसंपादन केले आहे. यापुढे बायपासचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. अशी ग्वाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिली.