नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने आज देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तक्रार फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी कर्मचारी महिलेने सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.
सरन्यायाधीशांविरोधात महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्या. इंदू मल्होत्रा व न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत सरन्यायाधीशांवरील आरोप निराधार असल्याचे सिध्द झाले आहे.
यासंदर्भात सरन्यायाधीशांना लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी एक याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर लगेचच सुनावणी घेण्यात यावी, अशी याचिकादाराची विनंती होती. ही याचिका न्या. बोबडे आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांच्या पीठापुढे आली असता या याचिकेवर योग्यवेळी सुनावणी होईल, असेही कोर्टाने नमूद केले आहे.