मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. जुलै-सप्टेंबरमधील महागाई भत्त्यात होण्याची वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
वृत्तानुसार, नरेंद्र मोदी सरकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढील महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. या वर्षी मार्चमध्ये, सरकारने 4 टक्के डीए वाढीची घोषणा केली होती, जी जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली होती. या वाढीसह, डीए मूळ वेतनाच्या 50 टक्के झाला. यानंतर अशी अटकळ होती की, सरकार मूळ वेतनात डीए समाविष्ट करू शकते आणि 0% वरून डीए पुन्हा सुरू करू शकते. मात्र, हे विचाराधीन नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये किमान ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत यांची गणना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते, जी विविध क्षेत्रातील किरकोळ किमतींमध्ये बदल मोजते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळत आहे. महागाई भत्ता 53% झाल्यानंतर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ त्यांचे मूळ वेतन किती आहे यावर अवलंबून असेल.