पुणे | राज्यातील शाळा सुरू होत असतांनाच केंद्र सरकारने तातडीने बालकांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्याची अपेक्षा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
याप्रसंगी अजित पवार म्हणाले की, राज्यातील शाळा ४ तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. लहान मुलांच्या लसीबाबत राज्याने निर्णय घेणं उचित नाही. जोपर्यत केंद्राच्या पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. केंद्र सरकारने लहान मुलाच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवणे आवश्यक आहे.
दरम्यान, पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा दर हा २.१ टक्के इतका आहे. या आठवड्यात लसीकरणामध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरा डोस घेतो तो व्यक्ती कोरोनाचे नियम पाळत नसल्याचं दिसून येतंय असं सांगत नागरिकांनी मास्कचा वापर करावा, काळजी घ्यावी असे आवाहन देखील उपमुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यातील अतिवृष्टीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत, विमा कंपन्याना सूचना दिल्या आहेत. पूरग्रस्त आणि शेतकर्यांना मदत करण्यासंबंधी आम्ही सकारात्मक आहोत. तर, मराठवाड्यातील पूरस्थिती ही जलयुक्त शिवारमुळे झाली असं काही तज्ञ म्हणतात. हे तपासून घ्यावं लागेल. या योजनेवर कॅगने या आधीच शंका उपस्थितीत केली आहे. आता हा नवीन मुद्दा उपस्थितीत झाला आहे. त्याची आधी चौकशी करुन मग याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.