जळगाव प्रतिनिधी । आरटीओ कार्यालयाच्या परिसरात खासगी वाहन नेण्यास बंदी आहे. असे असतांना तरूणाने कार आरटीओ कार्यालयाच्या आवारात आणली होती. उपविभागीय परिवहन अधिकारी शाम लोही यांनी ही कार जप्त केली आहे. तर तरूणाच्या विरोधात कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्याचे पत्र रामानंदनगर पोलिसांना दिले आहे.
अधिक माहिती अशी की, सय्यद इम्रान सय्यद आसीफ (वय २२, रा.शनिपेठ) याच्यासह चार तरुणांनी (एमएच १९ क्यु ३५३१) क्रमांकाची कार आत आणली होती. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत आरटीओ कार्यालयात कामकाज सुरू आहे.
कार्यालयाच्या परिसरात खासगी वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील संबधित वाहनचालक आतमध्ये कार उभी करुन तेथे लॅपटॉपमध्ये फार्म भरुन काम करीत होता. हे बेकायदेशीर असल्याचे लोही यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. उपविभागीय परिवहन अधिकारी शाम लोही यांनी ही कार जप्त केली आहे.
दरम्यान, सैय्यद इम्रान याने १८ ऑगस्ट रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात लोही यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. आरटीओ कार्यालयाच्या आवारात कार नेल्यामुळे उपप्रोदशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी त्याला मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यांच्यावर कारवाई करावी असे सय्यद याच्या अर्जात म्हटले आहे.